विंडो नोट्स

खिडकीतून बाहेर बघताना आकाशातली घार तरंगताना दिसणं, पेल्टोफोरमची फुलं गिरक्या घेत खाली सांडताना किंवा फांदीवरून खार धावताना बघणं किंवा कावळा जवळ येऊन भांड्यातलं पाणी पिताना बघणं हे काहीच तुमच्या विचारांच्या प्रोसेस मध्ये अडथळा आणत नाही, तुमची नजर शांतपणे त्यांच्या हालचालींचा मागोवा घेते, परत येते आणि शब्दांची ओळ सलग टाइप होते हातून. नजरेच्या टप्प्यातली पण आवाज न करता त्यांचं काम शांतपणे करणारी, वावरणारी माणसंही मनातल्या विचारांचा धागा खंडित करत नाहीत. चालतानाही हेच होतं. नजर आजूबाजूचं जग टिपत राहाते आणि मेंदू त्याचं विचार करण्याचं काम करत रहातो. विविध भारतीवरची जुनी गाणी ऐकतानाही विचारांना अडथळा येत नाही. साधारणपणे एक परिचित, संथ, संवेदनांवर ओरखडा न उमटवणारी लय जर दृश्याला, आवाजाला असेल तर त्याचा अडथळा वाटत नाही. उलट तुमच्या कामात त्याची सोबत मिळते, मदतही होते.

Comments

Popular posts from this blog