अत्यंत थकायला झालं आहे. रात्रभर कथेचे विचार, मागे पडलेल्या अनुवादाचे विचार डोक्यात होते, अधून मधून झोप येत होती त्यातून जाग आली की तेच विचार अजूनही असत. लेखक असणं ही फार विचित्र, कष्टमय गोष्ट आहे असं रस्किन म्हणतो त्यात काहीच चुकीचं नाही. मैत्रिणी, नातेवाईक, इतर सोशल कार्यक्रम हे सगळं मागच्या रांगेत टाकून प्रायोरिटी दिलेल्या लेखनातून इतकी मानसिक अस्वस्थता वाट्याला येत असूनही सकाळी पहिला विचार डोक्यात आला तोच आज कथा पूर्ण होईल का? त्या विचारानेच थकायला झालं. डाएट सुद्धा मागे पडलं आहे, सतत चहा आणि जेवण्याच्या टाळलेल्या वेळा त्यामुळे अजून काय होणारे. मग सगळं नीट आठवलं, जर्नल मधलं habit ट्रॅकिंग चं पान कितीही लाज वाटत असली तरी उघडलं. मग बेसिल, लेमनग्रास घालून बिनसाखरेचा चहा केला. स्वयंपाक, ब्रेकफास्ट आवरला, स्वयंपाकघर नीट आवरलं, मागवलेले मसाले, कसलं कसलं सामान नीट लावलं, पन्ह्याच्या कैऱ्या उकडून टाकल्या होत्या फ्रीजमध्ये त्या बाहेर काढला, ताक केलं भरपूर. गाणी लावली होतीच. मग आता बाहेर येऊन ब्लॉग पोस्ट टाकलं, तेव्हा जरा बरं वाटलं. अंधारे पॅसेज येतात ते पार करणं गरजेच आहे हे पुन्हा समजावलं. स्वतःलाच. 

Comments

Popular posts from this blog