कालचा दिवस अमित दत्तांच्या नावाने. किरण नादर म्युझियमने त्यांच्या सगळ्या फ़िल्म्स व्हिमिओवर टाकल्या होत्या. एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन फ़क्त आणि फ़क्त कलात्मकता आणि संशोधन हा निकष लावून बनवलेल्या पहाडी मिनिएचर्सच्या कला-परंपरेचा मागोवा घेणा-या फ़िल्म्स. त्यातली नैनसुख पाहिली होती. पण गीत-गोविंद, म्युझियम ऑफ़ इमॅजिनेशन्स, फ़िल्ड ट्रीप, चित्रशाला, सीन्स फ़्रॉम अ स्केचबुक, ड्रॉन फ़्रॉम ड्रीम्स, द गेम ऑफ़ शिफ़्टींग मिरर्स, द अननोन क्राफ़्ट्समन इतक्या काल पाहिल्या. जनगढ सिंग श्याम वरची बघायची होती, पण डोळे दुखायला लागले. आपल्याला जे आणि जसं करावसं वाटतं तसं, त्याच इन्टेन्सिटीने करणारा कोणी असेल तर तो आपला बिछडा हुआ सोलमेट असतो. अमित दत्ता तसा माझा सोलमेट आहे. कधीतरी हिमाचल प्रदेशात जाऊन तो रहातो तिथे महिनाभर रहाणार आहे. त्याच्या सोबत गुलेरला जाणार आहे. तो जसा फ़िल्म्स बनवतो, तसे एस्सेज, लेख लिहिणार आहे. दिवसा पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, निदान माझी. एमेन.
अमित दत्तांच्या
फ़िल्म्समधे झोकुन देण्याच्या आधी एक आत्मशोधाचा अनुभव आला काल सकाळी सकाळी. तोही
नोंदवून ठेवायलाच हवा. तुम्ही संवाद, भेटी कमी केल्या की तुमचे जे ढीगाने आसपास
जमवलेले मित्र-मैत्रिणी असतात ते अतिशय सहजपणे तुमचा ऎबसेन्स गृहित धरुन नवनवे
कार्यक्रम, प्रवास ठरवतात, तुम्हाला विचारतच नाही कारण तुम्ही संवाद-भेटी कमी
केल्या आहेत म्हणून असं उत्तर तुम्हाला मिळतं, त्यावेळी नेमकं काय वाटतं आणि काय
वाटायला हवं याबाबतीत माझ्या मनात गोंधळ आहे. मला हर्ट वाटलं आणि ते वाटण्याच
आश्चर्य वाटलं, आपण अगदीच शाळकरी वागत आहोत असंही. आणि मी ते विसरायचा प्रयत्न
केला. पण एक गोष्ट सत्य आहे की लोक विसरत नसतात. ते तुम्हाला विसरतात पण तुमचं
वागणं लक्षात ठेवतात. ते आतवर पुरलेलं रहातं. पण ते असतं. मग कधीतरी त्याचा अंकुर
बाहेर येतो आणि फ़टकारतो, तुम्हाला. या लोक नावाच्या जमातीत मी स्वत:सुद्धा असणार
आहे. फक्त आपण स्वत: कसे वागतो हे दुस-याच्या चष्म्यातून आपल्याला बघता येत नाही. त्यामुळे
त्याचा फ़ायदा स्वत:ला.
Comments
Post a Comment