स्टारटिंग पॉईंट न मिळणे

मे महिन्यात खूप कामं करायची आहेत. एप्रिल महिना प्रवास, vaccination, टाईमपास यात गेला त्यामुळे त्यातला बॅकलॉगही आहे. घरातही अनेक गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. पण मी काहीही करत नाहीये.
पसारा झाला आहे पुन्हा सगळा. कपडे, पुस्तकं हे तर नेहमीचंच, पण स्केचबुक्स, आर्ट सप्लाईज, कोलाजकरता कात्रणं, चित्र, मायक्रोग्रीनिंगचे ट्रेज, बिया, मशोबरातली फुलं सुकवायला ठेवलेली पुस्तकं, रेझिनच्या बाटल्या, मोल्डस, डायऱ्या, जर्नल्स, व्हिटामिन्सच्या बाटल्यांचे ट्रेज, गेल्यावेळी इसेनशीयल ऑईल्स घालून केलेले सोप्स मोहन-मुलींना आवडले म्हणून पुन्हा करायला मागवून ठेवलेलं मटेरियल, इको प्रिंटिंगचे स्टॅम्पस आणि त्यात माझा लिखाणाचा अमर्याद पसारा. दागिने, कॉस्मेटिक्स, साड्या, बॅग्ज, पर्सेस तर मी उल्लेखतही नाही. शिवाय याहून तिप्पट पसारा ठाण्याला स्टुडिओत. तिथल्या तर बुक शेल्फसही ओसंडत आहेत. 
डी-क्लटरिंग गरजेचं आहे, पण यातलं काहीच टाकायचं सुद्धा नाहीये. यात मजा अशी की हा सगळा पसारा हलता असतो तेव्हा त्याचा ताण नसतो, त्यात मजा असते. मधेच कधीतरी वेग मंदावतो, जसा गेल्या महिन्यात. आणि मग गोष्टींवरचा फिरता हात थांबतो आणि पसाऱ्याला बघता बघता साचलेपणाची कळा येते. हळू हळू अडगळ वाटायला लागते. तिथवर जायच्या आधी एक स्टर्न रिएलिटी चेक गरजेचा आहे मला. स्लो डाऊन करायला हवं, झेन त्यातच आहे वगैरे फिलॉसॉफी गुंडाळून ठेवून जास्तीत जास्त वेगाने हा पसारा आटोक्यात आणायला हवा. पेंडिंग कामं संपवायला हवी. पण त्या आधी हा गेले काही दिवस मनाला आलेला साचलेपणा घालवायला हवा. अक्षरशः काहीच होत नाहीये हातून. एक स्टारटिंग पॉईंट मिळायला हवा की गाडी सुरळीत वेगाने चालायला लागेल. मग तिला द्यायच्या वेगाचा विचार. Starting point मिळत नाहीये हाच तर मूळ मुद्दा.

Comments

Popular posts from this blog