लयीची किल्ली
वॉटर कलर्स किंवा स्केचिंग करताना एक गोष्ट लक्षात आली की यात तंद्री फार पटकन लागते. फोकस फिजिकली हातातल्या ब्रश, रंग किंवा पेन्सिलवर केंद्रित करायला लागत असल्याने ही तंद्री किंवा एकाग्रता पटकन साधली जाते. आणि मग -हीदम आपोआप मिळतो. काम पूर्ण झाल्याशिवाय तंद्री मोडत नाही. मग लिहिण्याच्या प्रक्रियेत ही तंद्री, फोकस, -हीदम साध्य करायला इतका वेळ, इतके श्रम का लागतात? कालची कथा लिहीत असतानाही हाच अनुभव आला की अगदी शेवटच्या टप्प्यात आल्यावर तंद्री, लय मिळाली. लय मिळणं महत्वाच आहे शेवटी. ही लय सुरुवातीपासून लिहिण्यात आणता का येत नाही? मुख्य कारण हेच असावं की लिहिताना मन इथे तिथे धावत राहातं, या कामावर, त्या कामावर. फेसबुक बंद केलं तरी मनाला पळण्याकरता इतर असंख्य दारं उघडी ठेवलेली असतात. फिजिकल फोकस अशक्य होऊन बसतो अनेकदा. किंवा मी ते अशक्य करते. मल्टीटास्किंगची लागलेली सवय, हातात घेतलेले अनेक प्रोजेक्ट्स हे माझं जुनं दुखणं आहे. पण त्यातूनच मार्ग काढायला हवा. वॉटर कलर्स, स्केचिंगचा फायदा होतो आहे याकरता हे लक्षात आलं या कथेच्या वेळी अचानक. लिहिण्यात सुरुवातीपासून -हीदम किंवा लय आणण्याचीही काही टेक्निकस असतीलच. ती शोधायला हवीत. आवडीच्या विषयावर लिहिणे वगैरे ठीकच. नावडीचे विषय झटकून टाकायला आता व्यवस्थित जमलं आहे मला, बहुतेक. तेव्हा हे कारण पुरेसं नाही. एका प्रोजेक्टवरून दुसऱ्या प्रोजेक्टवर मारलेल्या उड्या थकवतात मनाला आणि लय मिळायला अवघड होतं पण आता ते टाळणं सध्या तरी अशक्य. मला आवडतातच वेगवेगळी प्रोजेक्ट्स एकावेळी घेणं. मनीषा कोरडेच्या मते रायटिंग रीट्रीटस ना जाणे हा परफेक्ट उपाय असतो. नक्कीच. मी याचा अनुभव घेतला आहे. ठाण्याचा रायटिंग स्टुडिओ त्याकरताच तयार करते आहे. पण असे अनेकजण असतात जे या कशाही भानगडीत न पडता लिहिण्यात हुकुमी लय, तंद्री आणू शकतात. अगदी सुरुवातीपासून. हे मॅजिक नेमकं कसं साध्य होतं त्याची किल्ली शोधायला हवी. वॉटर कलर्स, स्केचिंग मधून काही सापडतय का यासंदर्भात ते बघायला हवं.
Comments
Post a Comment