ठाण्याला एक मार्चला जायचं असं ठरवलं होतं आणि इथल्या कामांच्या रांगेत ते निदान अजून चारेक दिवस शक्य नाही लक्षात आल्यावर सकाळपासून उगाच अशक्य चिडचिड सुरु झाली. खरं तर काहीच गरज नाही, असं कितीतरी वेळा जाणं येणं मागे पुढे होतं, पण आता झाली कारण स्वत:च्या स्पेसची, रायटींग स्पेसची, स्टुडिओ स्पेसची नितांत वाढलेली गरज. अशा जागेचा होत असलेला उपयोग लक्षात आल्यामुळे अक्षरश: ओढ लागते जायची. चार-पाच दिवस सलग रहायला मिळालं तरी निवांत वाटतं. खरं तर हीच कामं, म्हणजे घरातली नाही, लिहिण्याची मी तिथे करते, पण तिथे करताना ती सहज होतात. राजेन्द्र यादव आणि मन्नू भंडारीच्या एक इम्च मुस्कान मधे राजेन्द्र फ़िक्शन लिहायला पहाडांवर जायचे आणि मन्नूना घराच्या जबाबदारीमुळे जाता यायचं नाही. त्यामुळे एकदा त्यांनी घराच्या माळ्यावर टेबल टाकलं, अर्धं छप्पर काढलं आणि मोकळ्या हवेत, बरसातीच्या जागेत त्या लिहायला बसल्या. त्या म्हणतात, खरं तर आख्ख घर रिकामं असायचं, राजेन्द्र गेले की किचनमधेही काम नसायचं. वेळच वेळ. पण मन घराच्या पसा-यात निवांत होत नाही. बरसातीमधे मला मी आकाशाच्या थेट खाली, एकटी असल्याचं फ़िलिंग येतं. मला ते गरजेचं वाटतं. मन्नूंनी बरसातीमधेच आजका बंटी, येही सच है लिहिल्या. बाकी आज चिडचिड आवरेना म्हणून काल पाण्यात भिजवून ठेवलेल्या लाल भोपळ्याच्या बिया कुंडीत रोवल्या, तेव्हा गोकर्णीला सुंदर कळ्या आलेल्या, मोग-याच्या कळ्या उमललेल्या दिसल्या आणि मूड बदलला लगेच. मधुमालतीला मात्र अजून कळ्यांचे धुमारे का फ़ुटत नाहीत कळत नाही. कदाचित मुळातलं ते मातीतलं, कुंडीत त्याला कसमसल्यासारखं होत असेल. बघूया, खरं तर खूप मोठी कुंडी आहे, भरपूर उन्हही मिळतय. तुळस मस्त झालीय आता. गवती चहा छाटायला हवा. जागा मर्यादित आहे याचं त्याला भान नाही.
एफ़ेम ९२.७ आजा सनम...
best. माझ्याकडे आज लसणीला पाती आल्यात. हिरव्या पातीची चटणी होईल!!
ReplyDelete