आये गये मौसम

शनिवार रविवारी घरात भरपूर पेपर्स येतात. इंग्लिश पाच- टाईम्स, इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू, हिंदुस्तान टाईम्स आणि मिंट लाऊंज. मराठी दोन. लोकसत्ता, मटा. कोणे एकेकाळी मी रविवार संध्याकाळपर्यंत ते वाचून संपवत होते. कात्रणं वगैरे ठेवायचे, अजूनही आहेत ती. नंतर कधी उघडूनही न पाहिलेली फाईल. ते जाऊदे. तर आता म्हणजे गेले कित्येक महिने, वर्षं सुद्धा असेल, खरं तर फेसबुक नावाचा वेळखाऊ राक्षस आयुष्यात आल्यानंतर हळूहळू ही प्रक्रिया सुरू झालीच होती, तर हे पेपर्स वाचायचे राहून जायचे. मग मी खिडकीत त्यांचा गठ्ठा ठेवायचे. तो आठवड्यागणिक वाढत जायचा, त्याबरोबर माझा स्ट्रेसही. मोहन अत्यंत वैतागायचा, मुळात त्याला मी असे हे इतके पेपर्स घेणंच वेडपटपणा वाटतो, आणि अशी रद्दी, तीही रद्दीच्या कपाटाबाहेर साठत गेलेली पाहून तो अस्वस्थ होतो. घरात प्रत्येकाचे ओसीडी आहेत, त्यातला त्याचा हा एक. पण मी निगरगट्टपणे दुर्लक्ष करत, आज नक्की संपवते वाचून वगैरे म्हणत टोलवायचे. मधल्या काळात अजून दोनेक रविवार येऊन जायचे, मी त्यातले 2,3 पेपर्स संपवायचे, उरलेले पुन्हा खिडकीत. व्हायचं काय, ज्यांचे कॉलम किंवा विशेष लेख येतात पेपरमध्ये ते लिन्क शेअर करतात सोशल मीडियावर, मग त्या वाचून झाल्यावर बाकी पेपर वाचू नंतर म्हणून राहातो. काही वेळा आर्ट, कल्चर वगैरेची इतकी सुरेख फीचर्स येतात, की ती सावकाशच वाचायला हवी म्हणून बाजूला ठेवली जातात. तर हे सगळं भरताड लिहायचं मुख्य कारण, फेसबुक संन्यास घेतल्यावर पहिला संपला तो हा गठ्ठा. आज गेल्या आणि या वर्षीच्या दिवाळी अंकांचा बॅकलॉगही संपला. उद्या घरात रद्दीवाला येणार. संध्याकाळी. सकाळी येणारे आठही पेपर्स आणि हा ढिगारा घरातून हलणार. खिडकी मोकळा श्वास घेणार.
या ढिगात मला काही अत्यंत सुरेख रत्न सापडली. रझांवर क्रिशन खन्ना यांनी आणि अतुल दोडियाने लिहिलेला असे 2 अप्रतिम लेख. सुभाष अवचटच्या रफ स्केचेसमधला बंद फाईलतील चित्र हा लेख. कात्रणं ठेवली आहेत. आज ना उद्या त्यावर लिहिलं जाईल. आर्टबिर्ट ब्लॉग रिव्हाईव होईल. एक दिवस. मेरा खुदसे वादा.

Comments

Popular posts from this blog