रिकामा अवकाश आणि रंग

ज्यावेळी काहीच न करण्याचे मोमेंट्स येतात ते प्रदीर्घ असतात. लिहिण्याच्या दरम्यान अचानक रिकामा अवकाश भोवती पसरतो. तो आता मला जास्त सुस्पष्ट दिसतो, जाणवतो, धरून ठेवता येतो. तो रिकामा का आहे याचं जस्टीफिकेशन मी स्वतःला द्यायला लावत नाही. कसल्याही कोलाहलाने मी तो भरून काढत नाही. त्या रिकाम्या क्षणांचं शारीर अस्तित्व मी स्केचिंग पॅडवर आणायचा प्रयत्न करते. हा रिकामा तुकडा इतर कसल्याही केओसने मला भरून काढायचा नाही. 
लेखकाचं रिकाम्या अवकाशाशी काय नातं असतं, असायला हवं हे खरं तर एलकुंचवारांनी इतक्या सुरेखपणे लिहून ठेवलं आहे, अनेकदा मी वाचलं पण जेव्हा कळत तेव्हाच ते कळतं. त्या कळण्याची वेळ यावी लागते. ती या आधी आलीही अनेकदा, पण मी ती घेतली नाही.
मुळात माझ्यातल्या सर्जनशीलतेला फक्त शब्दांशी बांधून ठेवायचा हट्ट मी का करत होते इतकी वर्षे माहीत नाही. चित्रकाराला तीव्रतेनं शब्दातूनही व्यक्त व्हावसं अनेकदा वाटतं आणि कोरा कॅनव्हास सारख लेखन जन्माला येतं. लेखकाला शब्दाशिवाय इतर माध्यमांचीही गरज लागणंही तितकंच साहजिक आहे.   

Comments

Popular posts from this blog