हिवाळा संपत आला...
फेब्रुवारी तसाही माझा आवडता महिना. हिवाळा संपत आलेला असतो, खिडकीबाहेर पेल्टोफोरम सुरेख कोवळी पालवी पांघरून, उन्हाचा मोठा, उबदार झोत अंगावर.
ठाण्याच्या घरात बाकी सगळं आहे पण इथे आहे तसं पूर्वेचं उन्ह आणि खास पूर्वेचाच लखलखता प्रकाश नाही. तिथे उजेड भरपूर आहे, शांतता आहे, निवांत लिहीत बसावं असं वातावरण आहे. म्हणून तिथे माझा रायटिंग स्टुडिओ करत आहे. सध्या तरी काही आठवडे तिथे घालवायचे, मग पुन्हा पार्ल्यात यायचं असा प्लॅन आहे. यावेळी तिथला सगळा सेटअप पूर्ण केला, स्टुडिओत तसंही मला फार फर्निचर नको आहे. बुकशेल्फ, रायटिंग टेबल, स्टेशनरी आणि इतर गोष्टी ठेवायला जागा. मिथिलाने त्याकरता आयाकियामधून एक सुंदर लाकडी, जाळीचं डिझाइन असलेला पेटारा दिला आहे वाढदिवसाची भेट म्हणून. आता फक्त तिथे जाऊन पुस्तकं, सामान लावायचं आणि लिहायला सुरुवात करायची. अजूनही शेकडो पुस्तकं, नोटबुक्स पार्ल्यातल्या घरात आहेत, लिहायचे जे करंट प्रोजेक्ट्स चालू आहेत त्यांची मला ने-आण होणार आहेच कहाणी दिवस. बघूया कसं जमतंय. फेसबुकवरून काही महिने ब्रेक घेतला आहे. डोक्यात लिहिण्याच्या विषयांची बरीच गजबज आहे, बाकीची भरपूर कामं, प्रवास असं सगळंच. त्यात बाकी काही अनावश्यक स्ट्रेस नकोत. जितका जास्त वेळ मिळेल तितका हवा आहे.
काल मॅगी स्मिथचं कीप मूव्हिंग वाचायला घेतलं आहे. सुरेख गुळगुळीत व्हरमिलिअन हार्ड बाऊंड कॉपी आहे. किंडलवर वाचणार होते, पण मग हे पुस्तकच मागवलं ते बरं केलं असं वाटलं हातात घेतल्यावर. नोट्स ऑन लॉस, क्रिएटिव्हिटी अँड चेंजेस. This is going to be my book of the year.
Comments
Post a Comment