समांतर रस्ते

वेगवेगळे ट्रॅक्स पॅरलल चालू आहेत डोक्यात. म्हणजे सकाळचे दहा वाजले आहेत, खिडकीबाहेर आडव्यातिडव्या पसरलेल्या झाडांच्या पानं गळालेल्या रिकाम्या, तपकिरी फांद्या मला नॅशनल हायवे, मग त्यातून आता फुटलेले रस्ते, त्यातल्या गल्ल्या, क्रॉसरोडस, सबवे अशा दिसत आहेत. खारी, पारवे, चिमण्या त्या रस्त्यांवरून लगबग करत आहेत. उन्हाचे कवडसे छानपैकी खिडकीच्या संगमरवरावर पसरले आहेत, मायक्रोग्रीनस कोवळेपणाने चमकताहेत, मागची इमारत तशीही शांतच असते दिवसभर. आता तर काही जिवंत अस्तित्वाच्या खुणाही नाहीत. जी काही हालचाल आहे ती त्या झाडावर. तर ही पार्श्वभूमी. त्यावर माझ्या डोक्यातले समांतर ट्रॅक्स. एकामध्ये काल आर्टबिर्ट वर्कशॉप करता लिहून ठेवलेला कंटेंट, दुसऱ्यात मॉर्निंग पेजेस लिहायची आहेत तर उघडावा का जर्नल असा नुसताच एक रिकामा विचार, त्यानंतर लगेच समांतर करडईची भाजी उकडून ठेवली आहे फ्रीजमध्ये, ताकही आहे वगैरे, एका ट्रॅकवर श्रेयुसोबत पुन्हा एक कप चहा घ्यावा का, मग त्यातून आईची आठवण. बिगबास्केट डिलिव्हरीसोबत दोन एक्झिक्युटिव्ह डेट डायऱ्या आलेल्या पाहून तिने कपाळावर मारलेला हात आणि माझ्याकडे पाहून उडवलेले खांदे मला टॅबमध्ये डोकं खुपसलं असतानाही दिसतात. मी दुर्लक्ष करते. त्यातली एक तिला गिफ्ट देणार आहे, तिने मैत्रिणींसोबत नुकतंच स्वतःच कौंसेलिंग/ थेरपटीक सर्व्हिसेस वेब प्लॅटफॉर्म काढलं आहे. त्याबद्दल कौतुक किंवा एनकरेंजमेंट दाखवायला. तिला दिल्यावर मिथिला म्हणेलच मला नाही यावर्षी? पण मी लक्ष देणार नाही, दर वर्षी तिलाच देते या अशा गोष्टी, तीही रायटर म्हणून कदाचित. पण ती वापर करत नाही. 
फोटो काढेपर्यंत हवा ढगाळ झाली, उन्हाचे कवडसे गायब. मनातल्या विचारांचे ट्रॅक्स सुद्धा पुसट झाले. आता ओरगनाईझड विचारांना डोक्यात आणायला हवं. हा माझा कामाचा वेळ आहे. फुकट घालवून चालणार नाही.

Comments

Popular posts from this blog