जगण्याचे प्रयोग

 हा कुठलाही अधला मधला दिवस नव्हता, वर्षाचा पहिला दिवस. २०२१ साल उजाडलं. त्याहीपेक्षा २०२० संपलं याला यावेळी जास्त महत्व आलेलं.

तिचा उत्साह नेहमीसारखाच. म्हणजे नव्या वर्षाच्या स्वागताचे मेसेजेस पाठवणे, पार्ट्या वगैरेबद्दल अजिबात उत्साह नाही. कोणे एके काळी तो नेमका कधी होता हेही आता आठवत नाही.

उत्साह एकच, आणि तो वर्षानुवर्षे टिकून राहिलेला- प्लॅनिंग आणि रिव्ह्यू. नव्या वर्षाचे प्लॅनिंग, संपलेल्या वर्षाचा रिव्ह्यू.

यावर्षी बॉवरस्पेसच्या मेक माय डे प्लॅनर डाय-यांचा पूर्ण सेट घेतला आहे, गेल्या वर्षी बुलेट जर्नलिंग करता एक एक्स्पेन्सिव लेक्तर्नमची वही आणि बाकी रायटींग, मॉर्निंग पेजेस, नाईट लॉग्ज करता, ड्रीम्स-आयडिया जर्नलकरता वेगवेगळ्या देखण्या, गुळगुळीत, उंची पानांच्या वह्या. त्यातल्या सगळ्या नाहिच वापरल्या गेल्या. पण उत्साहात कमी नाही.

डाय-या-नोटबुक्स आणि प्लॅनिंग, जर्नलिंग वगैरेचं वेड नेमकं कधी लागलं तेही आठवत नाही. परवडत नव्हतं तेव्हा एकच डायरी सगळ्याकरता. त्याही आधी शाळेची असते तशी वही. पण उत्साह तोच. एवढ्या डाय-या/नोटबुक्स पूर्ण कधीच भरत नाही. अधे मधे पानं रिकामी असतात, पण तरी कुठे टू डू लिस्ट, पेंडींग कामे, आलेल्या फोनचे तपशील, रॅन्डम विचार, पुस्तक-सिनेमाच्या नोट्स, आर्ट एक्झिबिशनचा रिव्ह्यू, नाहीतर वाघ-बकरीमधे मैत्रिणीसोबत केलेल्या गप्पांचे उल्लेख तरी यात त्यात असतातच.

हेच जगण्याचे तुकडे.

काहीवेळा अत्यंत तपशिलात, काही वेळा त्रोटक, काही वेळा फ़्रस्ट्रेटींग-डीप्रेसिंग, कधी आनंदी-उत्साही नोंदी. याशिवाय रायटर्स ग्रूप, पर्सनल, अनपब्लिश्ड ब्लॉग्जवरही लिहिलं जातं. कुठे ना कुठे काही ना काही. 

तुकड्यांत बिखरलेली जिंदगी.

डायेट, मिनिमलिझम, इकिगाई, बुलेट जर्नलिंग, स्लो लिव्हिंग...

तिच्या जगण्याचे अनेक प्रयोग.

या प्रयोगांचा नेमका काय उपयोग झाला आहे आजवर?

मुळात आपण क्रिएटीव पर्सन आहोत, लिहितो- म्हणजे बेशिस्त, चाल-ढकल, आळशीपणा, पसारा हे गुण अंगात असणं साहजिक. यावर तिचा विश्वास. फ़्लेक्जिबिलिटी, स्पॉन्टेनिटी याला पुरेपूर वाव द्यायचा तर रुटीनमधे अडकणं हे पाप यावर तिची श्रद्धा. पण तरीही तिच्या अनेक मित्र-मैत्रिणी क्रिएटीव असूनही शिस्तबद्ध आहेत, त्यांची प्रॉडक्टिविटी भरपूर आहे, ते एकाच वेळी खूप गोष्टी करत असतात, हे ती पहाते, त्यामुळे आपल्याला स्वत:त सुधारणा करायचा कायमच भरपूर स्कोप आहे हे तिला मान्य आहे. त्यातून सेल्फ़ हेल्प, सेल्फ़ मॅनेजमेन्ट पुस्तकं वाचायला, जमवायलाही तिला आवडतं. किन्डल हातात आल्यावर तर या पुस्तकांच्या जमवाजमवीला काही सुमारच राहिला नाही. यातूनच काही वेळा आर्टिस्ट्स वे सारखी उत्कृष्ट पुस्तकही हातात आली, त्यातून जगण्याच्या प्रयोगांना खरी दिशा मिळाली.

दर वर्षी काही ना काही चॅलेन्ज असतोच. २०२१ मधे रोज लिहिण्याचा चॅलेन्ज. जगण्याच्या प्रयोगांबद्दल...       

Comments

Popular posts from this blog